Entertainment Lifestyle 

आई, बहीण, सून, सासू …. स्त्री आणि आधुनिक काळानुसार स्त्रीचे बदलते रूप!

Share This Post

आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती आहे काळानुसार या संस्कृतीमध्ये हळूहळू बदल होत गेले. पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही  शिक्षणाच्या आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या आज जगभरातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीही कार्यरत आहे. आजच्या एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीचे रूप सक्षम आणि प्रबळ आहे. परंतु या धावपळीच्या युगात ऑफिसच्या कामाबरोबरच घरातीलही कामाचा बोजा हा स्त्री वर्गावर पडल्याचे आपल्या सगळ्यांना दिसून येते. सततची होणारी धावपळ मुलांचा अभ्यास आणि घरातील इतर बारीकसारीक कामे अगदी नेटाने करण्याची जबाबदारी स्त्री वर्गावर सोपवलेली असते हे सगळं करत असताना नक्कीच सगळ्या स्त्रियांची दमछाक होत असते. कामाच्या तणावामुळे स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्या उद्भवतात. आज प्रत्येकाच्या घरातील स्त्रियांची हीच समस्या आहे परंतु या समस्येला नेमके कशा प्रकारे सामोरे जावे हा सगळा स्त्रियांसाठी जणू यक्षप्रश्नच आहे. काही सोप्या गोष्टींचा अवलंब स्त्रियांनी आपल्या रोजच्या जीवनात केला तर सततच्या येणाऱ्या ह्या समस्येतून त्या नक्कीच मुक्त होतील.

दिवसभरातील कामातून स्त्रियांनी स्वतःसाठी निदान थोडातरी मोकळा वेळ काढावा. मोकळ्या वेळेत आपले आवडते छंद जोपासावे किंवा एखाद्या आवडत्या कामात मन रमवावे. बालपणीच्या मैत्रीणीशी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. जुन्या आठवणीनां उजाळा द्यावा. गुहिणींनी घरच्या घरी लहानसा व्यवसाय सुरु करून त्यात मन रमवावे. जेणेकरुन आर्थिक हातभार लागेल आणि मोकळ्या वेळेचा सदुपयोग होइल. एखादी नवीन कला शिकून घ्यावी आणि नुसती कला न शिकता त्याचा योग्य तो वापर करण्यास दुजोरा द्यावा. आपल्या आवडत्या स्थळांना भेटी द्याव्यात आणि नवनवीन अनुभव जमा करावेत. प्रवासाचा आनंद घ्यावा. आपल्या आवडत्या विषयांची मासिके वाचावीत. मनोरंजनासाठी आवडत्या सिनेमाची किंवा गाण्याची मैफिल रंगवावी. स्त्रिया आणि माहेर यांचे एक अनोखे नाते असते. शक्य असल्यास काही दिवस माहेरी मुक्काम करावा थोडा हवापालट होतोच आणि माहेरच्या भेटीने मनही प्रसन्न होते.

पारंपरिक समाजरचनेनं पुरुषाचं आणि स्त्रीचं कर्तृत्वक्षेत्र आखून दिलेले आहे. पुरुषाच्या कर्तृत्वाला प्रथमपासून आजपर्यंत दहा दिशा मोकळ्या आहेत. स्त्रीचं कर्तृत्व-क्षेत्र चूल आणि मूल यात बंदिस्त होतं. आता स्त्रियांना कर्तृत्व क्षेत्राची खूप दारं उघडली आहेत. आज शिक्षण आणि नोकरीनिमित्त अनेक स्त्रिया देशभर, जगभर फिरताना दिसू लागल्या आहेत. पण परंपरेनं सांगून ठेवलेलं कर्तृत्वक्षेत्र अजून सुटलेलं नाही. या क्षेत्रात म्हणजे चूल आणि मूल सांभाळण्यात ती कशी आहे, हे समाज पाहत असतो. त्यावर बोचऱ्या नजरेने तिच्या कर्तृत्वशक्तीचे, गुणवत्तेचे मूल्यमापन करत असतो. या वातावरणामुळे पारंपरिक कर्तव्यं सांभाळली पाहिजेत, असं स्त्रीला स्वतःलाही वाटत असतं. याचा ताण ती अजूनही सोसते. कधी अपराधी भावनेने ती अस्वस्थ होते या ताणातून बाहेर येण्यासाठी साथीदाराची मदत स्त्रीला हवी आहे. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून पुरुषांनीही लक्ष द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. घरकाम – मुलांचे संगोपन ही नुसती स्त्रियांची कामे नसून पुरूषांचीही कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. ह्या आपल्या  वागण्यातूनच पुढची पिढी नक्कीच योग्य तो अर्थबोध घेईल.