Entertainment Lifestyle 

नवरात्री दिवस ०९ : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी विशेष स्थानी विराजमान असणाऱ्या सिध्दीदात्री देवीची महती

Share This Post

नवरात्री स्पेशल: नवमी – रंग: जांभळा

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.

जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री. जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा,क्षगरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे ‘सिद्धी’. साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल, तेंव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल. गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेमुळे “प्राविण्य आणि मुक्ती”या सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. हे देवीचे वेगवेगळे अवतार आहेत. हे नऊ रूप वेगवेगळ्या सिद्धी प्रदान करतात. यामाह्ये महागौरीपासून ते कालरात्रीपर्यंत नऊ रूप आहेत. हे नऊ रूप देवीच्या दहा महाविद्या रूपापेक्षा वेगळे आहेत. देवी महापुराणात त्या दहा महाविद्यांची माहिती सांगण्यात आली आहे. सिद्धीदात्री- दुर्गेचे हे नववे रूप. ती सिंहवाहिनी चतुर्भुजा व प्रसन्नवदना आहे. मार्कंडेय पुराणात ज्या आठ सिद्धी सांगितल्या गेल्या आहेत त्या सर्व सिद्धी देणारी ती सिद्धीदात्री म्हणून ओळखली जाते.

 

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति. चतुर्थकम्।।

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना:।।

(अर्थ – पहिली देवी शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायिनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी, नववी सिद्धिदात्री. हे दुर्गाचे नऊ रूप आहेत.)

 

Related posts