Entertainment Lifestyle 

नवरात्री दिवस 0८ : नक्की वाचा महागौरीने तपाने कसे केले भगवान शंकराना प्रसन्न

Share This Post

नवरात्री स्पेशल: अष्टमी – रंग: मोरपिसी

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’ तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे.

महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळू शकते.

सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे आणि जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहे त्याची या नवरात्रव्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केले आहे.

Related posts