Entertainment 

गुडी पाडवा न्हवे गुढी पाडवा

Share This Post

नाविन्याची आवड, नाविन्याबद्दल प्रेम, आकर्षण सगळ्यांना असतं. नवी सुरवात, नवी इनिंगही प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी खूप महत्वाची असते, ठरते. गुढी पाडवा हा असाच एक दिवस, सण आहे नवं निर्मितीचा. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी वर्षारंभ होतो.
हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे, प्रत्येक तिथीला एखादा सण किंवा धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे. वर्षभर चालणारे हे सण, उत्सव यांचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून सुरू होतो.

गुढी पाडव्याला गुढी उभारण्यामागे एक कयास हा आहे की श्रीराम रावणाचा वध करून, श्रीलंका विजय मिळवून चैत्र शुद्ध प्रतिपदेला परत आलेत त्यामुळे त्यादिवशी विजयोत्सव म्हणून गुढी उभारतात.
असा हा गुढीपाडवा विजयाचा उत्सव आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्रीरामाचं नवरात्र संपूर्ण देशात सुरू होतं ज्याची संपन्नता नऊ दिवसांनी श्रीराम नवमीला होते. त्यामुळेही या दिवशीगुढी उभारण्यालाकालौघात श्रीराम विजयाचा संदर्भ देण्यात आला असावा.
देशभरातील श्रीरामांच्या मंदिरात भक्तांची गर्दी होते. रामकथा ऐकवली जाते. भजन, कीर्तन मंदिरांमधून होतं.

x

गुढी पाडव्यासंबंधित समाज माध्यमांद्वारे एक चुकीचा संदेश पसरवला जातो तो म्हणजे आदल्या दिवशी फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या मस्तकाचं प्रतीक म्हणून गुढीवर तांब्या ठेवतात. हा अत्यंत चुकीचा आणि समाज विघातक दुर्विचार आहे. गुढीपाडवा हा फक्त विशेष एका जातीचाच सण आहे असा संदेश समाजविघातक प्रवृत्ती मुद्दाम पसरवतात.
हा विचार, दावा, कयास पूर्णपणे चुकीचा आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्वीपासून गुढीपाडवा सण साजरा केला जातोय. त्यामुळे अश्या विषारी संदेशामुळे समाजात विष कालवल्या जाऊ नये याची काळजी घेतली जावी.

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी महत्वाच्या कामांना सुरवात केली जाते. काही घरांत नववर्षाचे पंचाग आणले जाते, त्याची पूजा केली जाते. वसंत ऋतूची सुरवात होत असते.

गुढीपाडव्याला एक बांबू वा काठी घेऊन त्यावर एक काश्याचं, पितळीचं, तांब्याचं पात्र, लोटी ठेवली जाते. तिला गुढी समजून ती उभारली जाते. त्या गुढीला वस्त्र अर्पण केलं जातं. गुढीवर साखरेच्या पाकाची मिठाई, गाठयांची माळ ठेवली जाते. त्यानंतर गुढीची पूजा करून नैवेद्य अर्पण करतात. वसंत ऋतूची सुरवात म्हणजे नवचैतन्याची सुरवात, वृक्षांना नवपालवी फुटत असते. आयुष्यात कडू आणि गोड अनुभव, सुख दुःखाचे क्षण येतच राहतात, त्यांच्याकडे त्रयस्थपणे बघून ते जगावेत अशी शिकवण म्हणून वर्षारंभी गुढीपाडव्याला कडुनिंबाचा कोवळा पाला वाटून त्यात मिरी, गूळ, सैंधव मीठ टाकून छोट्या गोळ्या केल्या जातात. त्या खाल्ल्या जातात.
याचा आरोग्य लाभसुद्धा होतो. उष्णता वाढू लागल्याने कडुनिंब शीतत्व प्रदान करतो तर मिरे, सैंधव गूळ पाचक असतात.

घरी पुरणपोळी किंवा गोड पदार्थ केले जातात. दिवसभर ही गुढी उभारून सुर्यास्तवेळी ती गुढी काढली जाते.
अश्याप्रकारे गुढीपाडवा सण संपन्न होतो.

गूडी पाडवा नाही गुढीपाडवा:-
एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की अनेक लोक गूडी पाडवा म्हणतात ते चूक असून मूळ उच्चार गुढी पाडवा आहे.

देशभरात गुढीपाडव्याला श्रीराम नवरात्र सुरू झाल्याने गुढीपाडव्यापासून श्रीरामांच्या मंदिरात लोक दर्शनाला जातात. गुढीपाडव्यापासून रामरक्षा पठण करणे सुरू केलं जातं.

आजच्या धकाधकीच्या काळात काही सण त्यातील विधी तार्किकदृष्ट्या पटत नाही. पण खरी मजा हीच आहे की आजच्या वेगवान काळात काहीतरी अजूनही साधं, लोभसवाणे रूप, गोष्टी उरल्या आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी उभारली जाणारी गुढी ही त्या लोभसपणाचं एक प्रतीक आहे.

नवसंकल्प:-
गुढीपाडवा असा हा वर्षारंभ सण आणि नवं संकल्प सुरू करण्याचा दिन आहे. एक जानेवारीपासून संकल्प केले जातात. पण गुढीपाडवा हा नवं संकल्प, नवे काम सुरू करण्यास सर्वोत्तम दिन आहे. कारण हा वर्षाचा पहिला दिन तसेच पूर्ण शुभ मुहूर्त आहे.

नववर्षारंभाच्या शुभेच्छा!