Entertainment Lifestyle 

लहान मुलांना ह्या ५ सवयी नक्की लावा.

Share This Post

ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार मातीच्या गोळ्यापासून सुबक मूर्ती घडवत असतो त्याचप्रमाणे लहान मुलांना चांगले संस्कार आणि चांगल्या सवयींचे बाळकडू पाजले तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला योग्य हातभार लागतो.

सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये सर्वजण घरी असल्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावायची एक सुवर्णसंधी मिळालेली आहे. काही पालकांचे ऑफिसचे काम घरातूनच करावयाचे असल्या कारणामुळे मुलांकडे थोडेफार दुर्लक्ष होत आहे पण तसे न करता प्रत्येक पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावल्याच पाहिजेत. लहान मुलेही मोठ्यांचेच अनुकरण करत असतात. पालकांची वागणूक आणि सर्वच सवयी    आपोआपच मुलांकडे  येतात त्यामुळे मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी यातील फरक समजून दिला पाहिजे आणि चांगल्या सवयी निवडायला शिकवले पाहिजे.

  • तुमच्या मुलांना आरामात सोफ्यावर बसून दूरदर्शन बघायला परवानगी देणे त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून नवीन गेम्स खेळायला दुजोरा देणे या गोष्टी सर्वच पालकांनी टाळल्या पाहिजेत. मुलांना बैठ्या जीवनशैलीला बळी पडू देऊ नका. त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून द्या. नियमित शारीरिक कसरत आणि बैठ्या खेळांना दुजोरा द्या.
  • मुलांना अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वच्छता ही शिकवलीच पाहिजे. जेव्हा त्यांना वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या बघायची सवय लागेल, तेव्हा मुलं सुद्धा त्याचे अनुकरण करतील. जेव्हा मुले थोडी मोठी होतील तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता, पसारा आवरण्यासाठी त्यांना वेळ द्या आणि वस्तू योग्य जागी ठेवण्यास सांगा. हे नियमितपणे केल्याने, मुलं स्वतःहून त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करतील.
  • मुले जन्मतःच निष्पाप आणि निःपक्षपाती असतात. भेद हा सामाजिकतेचा भाग आहे. पालक म्हणून, आपल्याला केवळ आपल्या मुलांना भेदभावाच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यांना निःपक्षपाती राहण्यास शिकवा आणि गरीब असो वा श्रीमंत, शत्रू असो वा मित्र सगळ्यांशी सारखे कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन करा. तुम्ही त्यांना कुठल्याही जाती धर्मांच्या मुलांशी मैत्री करण्यास प्रोत्साहित करा.
  • मुलांशी कधीही खोटे बोलू नका. सतत प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा हा महत्वाचा गुण आहे आणि मुलांनी लहानपणापासून तो आचरणात आणला पाहिजे. तुम्ही मुलांचे पालक आहात, त्यामुळे तुम्ही मुलांचे रोल मॉडेल आहात. तुमच्या प्रत्येक सकारात्मक अथवा नकारात्मक शब्दाचा किंवा कृतीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो. प्रत्येकवेळी प्रामाणिक राहा, खास करून मुलांच्या उपस्थितीत मुलांना सर्व परिस्थितीत सत्य बोलण्यास प्रवृत्त करा.
  • जेव्हा तुमचे मूल, पैसे खर्च करून वस्तू विकत घेण्यास जबाबदार होते तेव्हा त्यांना तुमच्या कष्टार्जित पैशांच्या मुल्यांबद्दल शिक्षित करू शकता. तुम्ही मुलांना बचतीची सवय लावू शकता. कधीतरी पॉकेट मनी देऊ शकता किंवा पिग्गी बँक सुद्धा ठेऊ शकता. त्यांना एक अंदाजपत्रक द्या आणि त्यांचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करा. अशा प्रकारे, आपले मूल पैशांचे मूल्य शिकतील आणि बचत सुरू करतील.
  • आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी प्रार्थना म्हणण्याची सवय मुलांना जरुर लावा.प्रार्थना किंवा गायत्रीमंत्रासारखे मंत्र मनाला शांत करतात.मुलांमध्ये स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवातात.ह्रदयाला निरोगी ठेवतात,चिंता काळजी दुर करतात.डोळे बंद करुन ध्यानपुर्वक केलेली प्रार्थना मुलांमध्ये सकारात्मक विचार व अध्यात्मिक भावना निर्माण करते.

आपल्या आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी चांगल्या गुणांची शिदोरी आपल्याकडे दिलेली आहे. आणि आपण ती शिदोरी पुढच्या पिढीला सुपूर्त करून लहान मुलांना चांगल्या सवयी नक्की लावल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचा मानसिक शारीरिक व व्यक्तिमत्व विकास होईल.

Related posts