Entertainment Lifestyle 

एक उमेद ….. तिमिराकडून तेजाकडे करूया वाटचाल!

Share This Post

विसाव्या शतकामध्ये आत्महत्त्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला दिसून आली आणि एकविसावे शतकही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून  चालत असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. आत्महत्येचे सत्र फार पूर्वीपासून चालत आले आहे असे तर मुळीच नाही पूर्वीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर

पूर्वी भारतात सर्वत्रच एकत्र कुटुंबपद्धती होती. मायेची उब, एकमेकांना मिळणारी तातडीची मदत, लहान मुलांवर होणारे चांगले संस्कार, मानसिक आधार, नैसर्गिक मानसोपचाराचे जणू केंद्रच, कुटुंबातील व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाचे सुरक्षा कवच मिळाल्यामुळे नकारात्मक विचारांना आणि आत्महत्यासारख्या शब्दाला जागाच नव्हती. एकत्र कुटुंबात घरातील स्त्रिया मुलांचा सांभाळ आणि त्यांच्यावर संस्कार करीत होत्या आज त्याच्या अभावाने वाईट सवयी, एकटेपणा अशा अनेक समस्यांना मुले तोंड देताना आपल्याला दिसतात.

आई-वडील, मुले आणि नातवंडे इथपर्यंतच आता एकत्र कुटुंब मर्यादित झाले आहे.

घरातील महिला कामानिमित्त बाहेर गेल्यावर, अन्य महिलांच्या मदतीमुळे कुटुंबात अडचणी येत नाहीत. मुलांनाही मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय लागते. सण-समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे होतात. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे घराला कधीच कुलूप लागत नाही. त्यामुळे तुम्ही कधीही घरी या, तुमच्या दिमतीला कायम कोणी ना कोणी हजर असतेच. एकत्र कुटुंबात मुलांकडून सकाळी उठल्या उठल्या ”कराग्रे वसते लक्ष्मी….” अशा प्रार्थना, पूजा, संध्याकाळी रामरक्षा, परवचे म्हणण्याचा प्रघात होता. हे सर्व मेडीटेशनचे प्रकार होते. त्या काळीही ताणतणाव होताच, पण त्यातून सांभाळण्याचे काम ही पठणे करीत असत. मात्र, आता एकीकडे ताणतणाव प्रमाणाबाहेर वाढला, पण या ध्यानधारणेच्या सवयी सुटल्या. सबब आजच्या पिढीला ताणतणाव नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि त्यासाठी अन्य गोष्टींचा सहारा शोधावा लागतो. यामुळे चिंता, नैराश्य अशा मानसिक व्याधींचे प्रमाणही बरेच वाढले आहे.

जसजसा काळ बदलत गेला तसतसे एकत्र कुटुंबपद्धतीवर आघात होत गेले. मुलांवर आजी-आजोबांचे संस्कार होत नाहीत, वैयक्तिक स्वार्थाचा अतिरेक होतो, परस्परांना द्यायच्या वेळेचा अभाव, मानसिक आधार मिळत नाही, एकटेपणाची भावना, मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा अतिरेक, लहान वयात मानसिक आणि शारीरिक व्याधी अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे आहे ते आपल्या आजूबाजूच्या तरुणाईशी संवाद साधणे बदलत्या जीवनशैलीला सामोरे जाताना आपल्या आयुष्याचा समतोल तर ढळत नाही आहे ना, हे तपासून पाहायला आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे. प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यात येणाऱ्या आकर्षण, प्रेम, जोडीदाराची निवड या आनंददायी टप्प्याकडे तरुणाईला निकोपपणे बघण्यासाठी आपण मदत करणे आवश्यक आहे. आपल्या घरात या विषयांवर मोकळेपणाने बोलता यावे असे वातावरण तयार करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये निर्णय घेताना भल्या-भल्यांकडून गोंधळ होतात. तरुण वयात प्रेमातील नकारामुळे आयुष्यच व्यर्थ आहे ही भावना प्रेमाच्या उत्कटतेचा निर्देशांक नसून उतावळेपणा व अपरिपक्वता आहे. आयुष्य प्रत्येकाला परत परत संधी देत असते, हे या तरुणाईपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यालापैकी प्रत्येकाने ह्या समस्येबदल संवेदनशीलता दाखवली, तसेच शासन, समाज व माध्यमे यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर आपण तरुणाईचे हे आत्महत्येचे सत्र निश्चितच संपवू शकू.