Entertainment Lifestyle 

वाचाल तर वाचाल – ८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन!

Share This Post

आज ८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ( UNESCO) युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात ‘जागतिक साक्षरता दिन’ साजरा केला जाऊ लागला. वास्तवीक १९८८ मध्ये राष्ट्रीय साक्षरता योजनेची सुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.

व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देशाच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत. वर्षानुवर्षे दारिद्रयात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारिद्रयातून बाहेर पडते. अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजुला घडताना आपण पहातो हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.

आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि प्रौढ वर्गांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फी-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिक्षण घेणाऱ्यांसाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहे. आजच्या  ह्या साक्षरदिनी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या निरक्षर समाजाला साक्षर करण्याचा संकल्प घेतलाच पाहिजे त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून  आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देऊन त्यांना साक्षर बनवण्यासाठी थोडाफार हातभार लावला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपला देश प्रगतीपथावर येईल.

Related posts